|सहकारनामा|
दौंड : सरकार पैशासाठी आमची……. मारत आहे, मग आम्ही रुग्णांकडून का कमी पैसे घ्यायचे, मी काही मोफत सेवा देण्यासाठी बसलेलो नाही. माझ्या विरोधात कोणाकडे तक्रार करायची करा,10-15 हजार फेकले की आमचे काही होत नाही. ही डायलॉग बाजी आहे शहरातील एका नावाजलेल्या बाल रोग तज्ञ डॉक्टरची. एवढ्यावरच न थांबता या निष्ठुर डॉक्टरने वेदनेने तळमळत असलेल्या लहान मुलीवर उपचार न करताच दवाखान्यातून अक्षरशा हुसकावून लावल्याची घटना दौंड शहरात घडली.
रुग्णाच्या आईने या डॉक्टर विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. दौंड पोलिसांनी शहरातील बालरोग तज्ञ डॉक्टर व आणखी एकजण असे दोन जनांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार, फिर्यादी महिला हि तिच्या मुलीच्या नाकामध्ये चिंचोक्याची बी अडकल्याने तिला उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. महिलेच्या तक्रारीनुसार त्यांना बराच वेळ दवाखान्यामध्ये बसवुन ठेवण्यात आले, डॉक्टर आल्यानंतर मुलीची तपासणी लवकर करा अशी विनंती फिर्यादी यांनी केली असता तुम्हाला जास्त घाई झाली असल्यास येथून निघून जा, तुझ्या बाळास काही होत नाही असे म्हणून डॉक्टरांनी अरेरावीची भाषा करीत शिवीगाळ, दमदाटी केली व त्या स्त्रीला चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्याने त्या स्त्रीने दौंड पोलिसांत तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार दौंड पोलिसांनी या डॉक्टरसह दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातलगांनी आमच्या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार संबंधित डॉक्टरने फिर्यादी यांच्या मुलीला खूप त्रास होत आहे हे पाहूनही तिच्यावर उपचार न करता दवाखान्यातून निघून जाण्यास सांगितले. दवाखान्यातील आपल्याच महिला कर्मचाऱ्यांसमोर डॉक्टरांनी अश्लील भाषेचा वापर करीत अतिशय वाईट व उद्धट वागणूक दिली. तब्बल दोन तास फिर्याची यांची मुलगी वेदनेने तळमळत होती, परंतु त्याचा या डॉक्टरवर काहीच परिणाम झाला नाही. डॉक्टरने दवाखान्यातून निघून जा म्हणाल्या नंतर फिर्यादीने तळमळत असलेल्या आपल्या मुलीला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाऊन उपचार करून घेतले.
मिळत असलेल्या माहितीनुसार या डॉक्टर विरोधात दौंड पोलिसांकडे या आधीही तक्रारी आलेल्या असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या चुकीच्या वागण्या, बोलण्यामुळे या डॉक्टरला ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातलगांच्या रोषासही सामोरे जावे लागल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र तरीही या डॉक्टरच्या वागणुकीत का फरक पडत नाही अशा प्रतिक्रिया शहरातून येत आहेत.