आता ग्रामीण पोलीसांचेही सॅनिटायझेशन टनेलने निर्जंतुकीकरण, यवत, दौंड पोलीस ठाण्यात यंत्र बसवले



: सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

कोरोनासंसर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची काळजी घेणारे पोलीस मात्र स्वतः या आजाराच्या विळख्यात कधी येतील याचा नेम नाही. कारण नागरिकांना या महाभयानक संसर्गापासून वाचविण्यासाठी पोलीस अहोरात्र पहारा देत आहेत. कोरोनाचा संसर्ग त्यांना कधीही होऊ शकतो ही भीती त्यांच्या मनातही आहे मात्र तरीही कर्तव्य बजावण्यासाठी हे सर्व अधिकारी, कर्मचारी जीवाची बाजी लावून जनतेसाठी खंबीरपणे उभे आहेत. आता त्यांचाही कोरोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी खबरदारी घेतली जात असून या सर्व पोलिसांना आता पोलीस ठाण्यातून बाहेर जाताना, आणि येताना निर्जंतुकीकरण प्रक्रियेतून जावे लागणार आहे. याला सॅनिटायरझर टनेल असे नाव देण्यात आले असून आज  गुरुवारी दौंडविभागाच्या IPS उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी  यांच्या करिता आर्चिस सेठीया यांनी दिलेले सॅनिटायझेशन टनेल सुरू करण्यात आले.

हे टनेल या अगोदर पुण्यातील सहा पोलिस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात आले असून याच धर्तीवर यवत, दौंड पोलिस ठाण्यात हे बसविण्यात आले आहे. हे सॅनिटायजेशन टनेल आठ फूट उंच, सहा फूट लांब व पाच फूट रुंद आहे. यात फॉगर स्प्रे सिस्टीम करण्यात आली आहे. सॅनिटायझर टनेलच्या बाजूला असणाऱ्या ड्रममध्ये सॅनिटायरझर टाकले जाते. ते सॅनिटायझर फॉग स्प्रे मार्फत त्या टनेलमध्ये जाणाऱ्या पोलिसांच्या अंगावर आणि कपड्यावर पूर्णपणे स्प्रे केले जाते त्यामुळे कपडे आणि शरीराचा उघडा भाग हा पूर्णपणे निर्जंतुक होण्यास मदत होते.