दौंडमधील ‛या’ गावांनी घेतला भिलवाडा पॅटर्नचा आदर्श, रस्ते करण्यात आले ‛सील’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीत कोरोनामुक्तीसाठी भिलवाडा पॅटर्ननुसार कामकाज करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. मात्र बारामती तालुक्याच्या बाजूलाच असणाऱ्या दौंड तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वीच काही गावांनी भिलवाडा पॅटर्नचा आदर्श घेत गावातील रस्ते सील करून तो पॅटर्न अमलात आणण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला आहे. दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या केडगावची लोकसंख्या ही आता वीस हजारांच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे केडगावच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीने गेल्या तीन दिवसांपूर्वी बैठक घेऊन भिलवाडा पॅटर्नच्या धर्तीवर उपाय योजना करण्याचा निर्णय करत त्या पार्श्वभूमीवर केडगाव शहरातील सर्व मुख्य रस्ते सीलबंद करण्यात आले आहेत. बाहेरून येणारी अत्यावश्यक सेवांची सर्व वाहने इतर रस्त्यांनी काढून दिली जात आहेत. विशेष म्हणजे केडगाव किंवा दौंड तालुक्यामध्ये अजून एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही मात्र खबरदारीचे उपाय म्हणून हा पॅटर्न राबवला जात आहे. बारामतीमध्ये कोरोनामुळे  एका भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाल्यानंतर दौंड तालुक्यातही प्राथमिक उपाय योजनांसाठी प्रशासना सरसावले आहे. याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल हे परिस्थितीवर जातीने लक्ष देऊन आहेत. पोलिसांनी सुद्धा रस्त्यावर विनाकारण फिरताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई सुरू केली असून नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये यासाठी यवत आणि दौंड पोलीस सर्व प्रकारे नियोजन करीत आहेत.