संपादकीय : स्वयंघोषित पत्रकार, बोगस चॅनेल्सवर संक्रांत! पत्रकार संघटनेनेही उघडली बोगस पत्रकारांविरोधात मोहीम



संपादकीय : संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्वयंघोषित बोगस पत्रकारांनी थैमान घातले आहे. कोणत्याही प्रकारची वृत्तपत्र विद्या (जर्नालिजम) ची पदवी नाही, कुठलीही शासकीय मान्यता असलेले वृत्तपत्र, वृत्तवाहिनी नाही मात्र तरीही बोगस प्रेस आयकार्ड आणि बोगस न्यूज चॅनेलचे बुम हातात घेऊन काही स्वयंघोषित पत्रकार हे अनेक ठिकाणी वावरताना आणि वृत्तांकन करताना दिसले आहेत. मात्र आता या विरोधात शासकीय यंत्रणेनेही कारवाईचा बडगा उगारला असून अश्या बोगस पत्रकार/चॅनेलवर आता शासकीय कार्यालयांतून नोटिसा काढून याबाबत माहिती मागवली जात आहे आणि जर कोणतीच परवानगी घेतलेली आढळली नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार हेही आता लपून राहिलेले नाही त्यामुळे अशा बोगस पत्रकारांचे धाबे दणाणले आहेत. कोणतेही चॅनेल अथवा वृत्तपत्र काढताना शासकीय परवानगी घ्यावी लागते. या परवानग्या मिळविण्यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावे लागते. मात्र काही महाभाग कोणतीही शासकीय परवानगी न घेता थेट बोगस वृत्तवाहिन्या काढून हवे ते वृत्त प्रसारित करण्याचा धडाकाच सुरू केला आहे. विशेष म्हणजे या बोगस चॅनेलच्या महाभागांनी आपले बोगस पत्रकार नेमून त्यांना प्रेस लिहिलेले आयकार्ड सुद्धा दिले आहेत. मात्र या बोगस पत्रकारांना जर कुणी आपली संस्था परवानगी घेऊन सुरू केली आहे का? असा प्रश्न केला तर हे महाभाग थेट हातघाईवर येऊन दमदाटी करण्यास सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत असा अनुभव काहीजण सांगत आहेत मात्र आता या बोगस पत्रकार आणि चॅनेल्सना रोखण्यासाठी खुद्द पत्रकार संघटनाही सरसावल्या असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी आपण लवकरच सर्व शासकीय अधिकाऱ्यांना भेटून याबाबत कारवाई करण्यासाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे. 

अब्बास शेख, 

: संपादक ‛सहकारनामा’