नारायणगाव : सहकारनामा ऑनलाईन
राज्य शासनाने गुटखा खाण्यावर तसेच विकण्यावर बंदी घातली आहे तरीपण या ना त्या मार्गे गुटखा मिळतच असतो मात्र हा गुटखा विविध दुकान आणि पान टपऱ्यांवर कसा येतो याबाबत अनेक कयास लावले जातात परंतु आता मात्र काही भागामध्ये गुटखा कुठून आणि कसा पोहोचतो याचा उलगडा होत आहे. मांजरवाडी गावचे पोलीस पाटील सचिन टाव्हरे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या सतर्कतेमुळे गुटखा वाहतूक करणारा पोलिस कॉन्स्टेबल किशोर धवडे आणि हनिफ इब्राहिम तांबोळी या दोघांचा पर्दाफाश झाला आहे. गुटखा सप्लाय करणारा हा पोलीस शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून गुटखा व्यवसायात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे . याबाबत फिर्यादींनी सांगितल्याप्रमाणे
शुक्रवार दि.१० एप्रिल राजी रात्री साडेदहाच्या सुमारास मांजरवाडी हद्दीत नाकाबंदी करताना जाधववाडी बाजुकडून एक लाल रंगाची बिना नंबर प्लेट असलेली स्विफ्ट कार येताना दिसली. म्हणून तिला थांबवली. कारमध्ये मध्ये खाकी ड्रेस घातलेला एक पोलीस व त्याच्याशेजारी एक व्यक्ती बसलेला दिसला. त्यांना तुम्ही कोठे चालले आहेत असे विचारले असता त्यांनी आम्ही जेवणासाठी चाललो आहे असे सांगत ते नारायणगावच्या दिशेने निघून गेले. या सर्व प्रकाराचा पोलीस पाटील यांना संशय आला. पोलीस पाटील यांनी सहायक
पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील
यांना ही माहिती दिली. त्यानंतर पुन्हा शनिवारी रात्रीच्या सुमारास स्विफ्ट गाडी नारायणगाव बाजुने जोरात येताना दिसली. ती गाडी नारायणगावहून
मांजरवाडीमार्गे शिरूरकडे जाताना
मांजरवाडी येथे नाकाबंदी दरम्यान गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला असता हवालदार किशोर धवडे याने गाडी जोराने चालवित जाधववाडी
बाजुच्या रस्त्याने निघून गेली. सचिन टाव्हरे यांनी तात्काळ पुढे काही ग्रामस्थांना मोबाइलवरून
माहिती देऊन ग्रामस्थांसाह गाडीचा पाठलाग
सुरू केला असता ग्रामस्थांनी अखेर
गाडीचा पाठलाग करत कार थांबवली. दरम्यान पोलीस स्वप्नील लोहार, सातपुते, शेख यांनी दोघांना
ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये ३० हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गुटखा आढळून आला. दरम्यान नारायणगाव पोलिसांनी गुटखा वाहतूक प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या सोबत असणाऱ्यावर गुन्हा दखल करून ३० हजाराच्या गुटख्यासह ३ लाख ५० हजार किमतीची स्विफ्ट कार असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.