पुणे : सहकारनामा ऑनलाईन
लोणीकाळभोर इंदिरानगर ता.हवेली जि.पुणे येथुन पुणे ग्रामीण एलसीबी शाखेचे पथकाने कोरोना रोग प्रतिबंधक संचारबंदी कालावधीत एका सराईत गुन्हेगाराकडून एक तलवार जप्त करून आर्म अॅक्ट अन्वये कारवाई केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना कोरोना रोग प्रतिबंधक संचारबंदी अनुषंगाने लॉक डाऊन कालावधीत गुन्हे शाखेची साध्या वेशातील पथके नेमून सस्त्यावर विनाकारण फिरणारे, जिवनावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणारे व इतर अवैध बेकायदा कृत्य करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर क्षिरसागर, काशिनाथ राजापुरे यांचे पथक नेमलेले होते. लोणीस्टेशन कदमवाकवस्ती येथील एका तरुणाने संचारबंदी कालावधीत वाढदिवसाचा केक हा सार्वजनिक ठिकाणी तलवारीने कापल्याचे फोटो व व्हीडीओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झालेली होती. याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी तरुणाची माहिती काढली असता त्याचेवर यापूर्वी गुन्हे दाखल असून तो नेहमी दहशतीसाठी सोबत हत्यार बाळगून फिरत असल्याची माहिती समजली. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. सदर पथक हे दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी लोणीस्टेशन चौक येथे असताना ऋषी पवार हा तरूण दहशतीसाठी त्याचे कमरेला तलवार बाळगून इंदिरानगर परिसरात फिरत आहे अशी खबऱ्यामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथकाने तात्काळ इंदिरानगर येथे जावून सापळा रचून पाण्याचे टाकीजवळ रोडवर संशयास्पदरित्या फिरत असलेला ऋषीकेश सुरेश पवार (वय २१ वर्षे रा.कदमवस्ती, जि.प.शाळेमागे, कदमवाकवस्ती ता.हवेली जि.पुणे) याचे जवळ जाताच तो पळून जाउ लागला असता त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले व त्याचेकडून बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर हेतुस्तव कमरेला बाळगलेली एक लोखंडी तलवार असा एकुण किं.रु. १,०००/ – चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपीविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला आर्म अॅक्ट कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेला आहे. यातील आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेविरूध्द यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दुखापत, आर्म अॅक्ट, दरोडा तयारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने तलवार कोठून आणली? कोणत्या कारणासाठी जवळ बाळगली? याबाबतचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर हे करीत आहेत.