सातारा : सहकारनामा ऑनलाईन
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ले झाले आहेत आता यात होम गार्डचीही भर पडली असून सातारामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सातारा शहरामध्ये असणाऱ्या सदरबाजारमध्ये होमगार्ड बंदोबस्त करत होते त्यावेळी तेथे असणाऱ्या जमावाने त्यावर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना घडली आहे. सुमारे वीसजणांच्या जमावाने हल्ला केल्याची माहिती समोर येत असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सदर बाजार येथील एका झोपडपट्टी परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. जखमी झालेल्या होमगार्डचे नाव विश्वनाथ म्हमाने असे असून त्याच्यावर हल्ला केल्याप्रकरणी हनुमंत नाटेकर, अभिषेक गबाळे, सचिन शिंगटे, मल्लाप्पा सुतार यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सदर बाजार परिसरामध्ये पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. बाजार परिसरात फिरताना तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यास होमगार्डने हटकल्याने तो तरूण पळू लागला आणि पळत असताना पडल्याने तो जखमी झाला. या घटनेनंतर या परिसरात जमाव जमला आणि त्यांनी होमगार्डशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी होमगार्डने माझ्याशी हुज्जत घालण्यापेक्षा जखमी तरुणाला दवाखान्यात घेऊन जा असे सांगताच जमावाने होमगार्डला बेदम मारहाण करत जबर जखमी केले.