daund crime – दौंड महसूल विभागाच्या ताब्यातील वाळूचे जप्त ट्रक चोरीला जाण्याची शृंखला कायम! अनेक ट्रक चोरीस, पण चोरीला गेलेल्या वाहनांचा अद्याप पत्ताच नाही



|सहकारनामा|

दौंड : शहर प्रतिनिधी (अख्तर काझी)

शहरातील प्रशासकीय इमारतीच्या आवारातून महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेला ट्रक चोरीस गेल्याची घटना घडली. प्रशासकीय इमारतीच्या आवारातून अशाच कारवाईत जप्त केलेले अनेक वाळूचे ट्रक याआधीही अनेक वेळा चोरीस गेले असल्याची नोंद दौंड पोलीस ठाण्यात आहे. मात्र चोरीला गेलेल्या एकाही ट्रक चा अध्याप तपास लागलेला नाही. असे असतानाही जप्त केलेले वाळूचे ट्रक चोरीला जाण्याची परंपरा आजही कायम असल्याचे चित्र समोर येत आहे.

दि.6 सप्टेंबर रोजी ही कारवाईत  जप्त केलेला ट्रक चोरीला गेला आहे. याप्रकरणी दौंडचे तलाठी हरिश्चंद्र तात्याबा फरांदे यांनी फिर्याद दिली असून राजेंद्र सोनवणे (रा. निमगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्या विरोधात दौंड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

 पोलिसांच्या माहिती नुसार, दि.1/12/2017 रोजी महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करीत असताना ट्रक(MH-12 DG-199) जप्त करण्यात आलेला होता.व तो ट्रक(की.5 लाख रु.) दौंड प्रशासकीय इमारतीच्या आवारात लावण्यात आलेला होता. आरोपी राजेंद्र सोनवणे याने लबाडीने, स्वतःच्या फायदया करिता तो चोरून नेला आहे. असे फिर्यादीत नमूद केले आहे.

दि. 6 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्या आदेशाने प्रशासकीय इमारती परिसरात जप्त केलेल्या ट्रकची पाहणी करण्यासाठी गेलो असता सदरचा जप्त ट्रक आढळून आला नाही. हा ट्रक राजेंद्र सोनवणे यानेच चोरून नेला आहे असे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मालकानेच ट्रक चोरून नेला आहे असे महसूल विभागाला वाटते आहे, मात्र हा ट्रक राजेंद्र सोनवणे यांच्या मालकीचाच नसल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात नक्की काय भानगड आहे याबाबत उलट सुलट चर्चा चर्चिली जात आहे.