परराज्यातून घरी निघालेल्या मजुरांसाठी सोनिया गांधींची मोठी घोषणा, मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे काँग्रेस देणार



नवी दिल्ली : वृत्तसेवा

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर याचा सर्वात जास्त फटका हा मजूर आणि कामगारांना बसला आहे. त्यामुळे या मजुरांनी पैसे आणि जाण्याचे साधन  नसल्याने पायीच आपल्या घराकडे कुच केली आहे. ही सर्व घडामोड पाहता केंद्र सरकारने निर्णय घेत या मजुरांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे मात्र हा रेल्वे प्रवास मोफत नसून त्यासाठी तिकीट असल्याने या मजुरांची मोठी अडचण होऊन बसली होती. आता यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठा निर्णय घेत मजुरांसाठी येणारा तिकीटाचा खर्च स्वतः काँग्रेस करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्याने हातावर पोट असलेल्या मजुरांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यातच आपल्या घराकडे जायला तिकीट काढायचे असल्याने या मजुरांना आर्थिक चिंतेने घेरले होते मात्र सोनिया गांधी यांनी वरील घोषणा केल्याने आता मजुरांना आपापल्या घरी जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.