|सहकारनामा|
दौंड : उच्च न्यायालयात दाखल दोन याचिका व त्यावर उच्च न्यायालयाने दिनांक 20 ऑगस्ट व 7 सप्टेंबर रोजी पारित केलेले आदेश पाहता नगराध्यक्ष यांची याचिका निकाली काढली आहे, व दुसऱ्या याचिकेवर 21 सप्टेंबर रोजी 20 ऑगस्ट चा आदेश तसाच ठेवून पुढील सुनावणी ठेवली आहे.
या निकालांमध्ये स्थायी समितीची मीटिंग घेऊ नये अथवा विषय वगळून सभा घ्यावी असे कोठेच म्हंटलेले नाही, त्यामुळे नगरपालिकेचे कामकाज करण्यास आता कसलीही अडचण नाही असे गटनेते बादशहा शेख व ज्येष्ठ नगरसेवक इंद्रजीत जगदाळे यांनी उच्च न्यायालयाच्या निकालावर पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला.
नगराध्यक्ष स्थायी समिती, सर्वसाधारण सभा घेत नाही, यामुळे शहरातील विकास कामे रखडली आहेत असा आरोप करीत नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या नगरसेवकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. व याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. नगराध्यक्ष सभा घेत नसतील तर उप नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याची संमती मिळावी अशी मागणीही आंदोलकानी केलेली होती. आमची ही मागणी मान्य झाली असून उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्याची आम्हाला संमती मिळाली आहे असे सांगत गटनेत्या सह या नगरसेवकांनी आपले आंदोलन संपविले व 20 ऑगस्ट ला आम्ही सभा घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादी, मित्रपक्षांचे उप -नगराध्यक्ष यांना सभा घेण्याचा अधिकारच नाही, त्यांनी बोलाविलेली सभा बेकायदेशीर आहे, अशी भूमिका घेत नगराध्यक्ष शितल कटारिया यांनी या संपूर्ण प्रक्रिये विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. तसेच कटारिया गटाचे गटनेते बबलू कांबळे यांनी व दलित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दलित वस्ती निधीचा गैरवापर होत असल्याबाबत दुसरी याचिका दाखल केलेली होती.उच्च न्यायालयाने नगराध्यक्ष यांचे म्हणणे ग्राह्य म्हणून नियोजित सभेला स्थगिती देत दिनांक 7 सप्टेंबरला जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व इतर यांनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडण्याचा आदेश दिलेला होता.
दि. 7 सप्टेंबर रोजी या दोन्ही याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये नेमका काय निकाल लागतो याची सर्वांनाच उत्सुकता होती. या दिवशी उच्च न्यायालयाचा निकाल हाती आल्यानंतर नगरपालिकेतील दोन्ही गटाने शहरात फटाके फोडले होते. त्यामुळे निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागला आहे? एकच मॅच दोन्ही संघ कसा जिंकू शकतो अशी संभ्रमवस्था येथील सामान्य नागरिकांची झाली होती. मात्र राष्ट्रवादीने आज त्याचा खुलासा केला.
न्यायालयाच्या निकालानंतर गटनेते बादशहा शेख यांनी नगराध्यक्ष यांच्याकडे मागणी केली आहे की, त्यांनी स्थायी समितीशी संलग्न असणारे सर्व विषय घेऊन सभा घ्यावी. शेख यांच्या मागणीनुसार नगराध्यक्ष सभा घेतात का? व सभेच्या अजेंड्या मध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित असलेल्या विषयाचा समावेश करतात का? याकडे नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे.
नगराध्यक्ष यांनी जर पुन्हा आमचे अपेक्षित विषय सभेच्या अजेंड्या मध्ये घेतले नाहीत तर आम्ही पुन्हा नगराध्यक्ष यांचा तो अजेंडा नाकारणार आहोत. वेळ पडल्यास पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही बादशहा शेख यांनी दिला आहे.