थेऊरमध्ये आरोग्य खात्याचे काम कौतुकास्पद



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन

कोरोना संक्रमणाचा देशात शिरकाव होताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य सेवक व सेविकांचे कार्य खुपच मोलाचे ठरत आहे. घरोघरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची माहिती तसेच तपासणी करण्याचे काम उन्हाची तमा न बाळगता चालू आहे. या कामामध्ये आशा सेविकांचेही मोठे सहकार्य लाभत आहे. आरोग्य सेवकांनी दाखवलेल्या तत्परतेने आज ग्रामीण भागातील गावांची परिस्थिती चांगली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी अंतर्गत येत असलेल्या थेऊर उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डाॅ पुजा सूर्यवंशी यांनी आपल्या सहकारी आरोग्य सेविका भारती सोनवणे व आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार यांच्या मदतीने संपूर्ण गावातील कुटुंबाची माहिती गोळा करत आरोग्य विषयक सूचना दिल्या आहेत.हे गाव पुणे शहराजवळ असल्याने येथे अनेकजण लपून छपून येतात अशा लोकांना शोधून काॅरंटाईन करण्यात आले. त्यांनी उन्हाची तमा न बाळगता घरोघरी सर्वेक्षण केले. यासाठी आशा सेविका पुष्पलता गायकवाड, दिपाली सावंत, ज्योती टोंपे, पुष्पा गायकवाड यांनी मदत केली आहे. 

कोरोना विषाणूचा फैलाव पूर्व हवेलीत झाला असला तरीही थेऊर मध्ये आरोग्य खात्याच्या सतर्कतेमुळे आजपर्यंत कोणताही संशयीत आढळून आला नाही ही जमेची बाजू मानली जात आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावातील सर्व व्यवहार बंद असून केवळ अत्यावश्यक सेवा सकाळी दहा वाजेपर्यंत चालू आहेत.