Daund issues – दौंड नगरपालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात.. नगरपालिकेच्या जागेतच बियर बार मालकाचे अतिक्रमण! नगरसेवकाच्या तक्रारी अर्जाला नगरपालिकेकडून केराची टोपली



|सहकारनामा|

दौंड : दौंड नगरपालिकेने ज्या बियर बार (सावंत नगर) मालकाला ना हरकत दाखला दिला, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला त्याने नगरपालिकेच्या जागेवरच अतिक्रमण केले असल्याचे समोर येत आहे. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बियर बार मालकाने अतिक्रमण केले आहे असे आता न. पा. चे अधिकारी सांगत आहेत. शहरातील प्रभाग क्र. 10 चे नगरसेवक जीवराज पवार यांनी या अतिक्रमण बाबत जून महिन्यातच नगरपालिके कडे लेखी तक्रार केलेली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी नगरसेवकाच्या तक्रारीला महत्त्व न देता केराची टोपली दाखविली आहे. अतिक्रमणावर कारवाई न करणाऱ्या प्रशासना विरोधातच गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर सेवकांकडून होत आहे. तसेच या बार ला दिलेली NOC न.पा. ने रद्द करावी व पालिकेच्या जागेतील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अशी मागणीही नगरसेवक करीत आहेत. राज्यामध्ये सरकार राष्ट्रवादी- मित्र पक्षाचे, जिल्ह्याचे पालक मंत्री राष्ट्रवादी चे, नगरपालिकेत  बहुमत याच पक्षाचे, असे असताना नगरपालिकेत पक्षाच्या नगरसेवकांचे ऐकले जात नाही असे चित्र आहे. आणि तरी आम्ही सारे गप्प का? याचे उत्तर मात्र कोणाकडे नाही.

 बियर बार मालकाला  नगरपालिकेने याआधीच एक नोटीस काढलेली असताना, पुन्हा नोटीस देऊनच कारवाई करावी लागणार असे नगरपालिकेतील अधिकारी ठामपणे सांगत आहेत. या अतिक्रमणावर कारवाई केली नाही तर आम्ही प्रशासनावर गुन्हा दाखल करू असा इशाराही नगरसेवकांनी दिल्यानंतर….. काहीच हरकत नाही असे उत्तरही अधिकाऱ्याकडून मिळत आहे हे विशेष.

 नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दि. 24 जून 2021 रोजी नगरपालिकेने अतिक्रमण करणाऱ्या मालकाला नोटीस काढण्याचा फार्स मात्र केला आहे. सदरचे अतिक्रमण सात दिवसाचे आत स्वखर्चाने स्वतः काढून टाकून लगतचे खुली जागा क्षेत्र मूळ हद्दी सह नगरपालिकेस उपलब्ध करून द्यावे व तसेच लेखी कार्यालयाकडे कळवावे, अन्यथा तुमचे विरुद्ध नगरपालिकेस कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल व त्या कामी येणारा खर्च तुमच्याकडून वसूल केला जाईल असा इशाराही नगरपालिकेने अतिक्रमण करणाऱ्याला दिला आहे. परंतु अडीच महिन्या नंतरही नगरपालिका सदरचे अतिक्रमण काढू शकलेली नाही ही वस्तुस्थिती पहायला मिळत आहे. वार्डातील रस्ते करताना गोर गरिबांची घरे पाडणारी, रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांवर दादागिरी करणारी नगरपालिका स्वतःच्याच जागेवरील अतिक्रमण करणाऱ्या धनधांडग्या समोर का नांगी टाकत आहे असा सवाल उपस्थित होत आहे. 

सदरील अतिक्रमणावर नगरपालिकेने कारवाई न केल्यास मंगळवार दि. 14 सप्टेंबर रोजी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयास टाळे ठोकून कामकाज बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरपालिकेला देण्यात आला आहे.