दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यात राज्य राखीव दलाचे दोन गट असून या गटातील जवानांच्या कंपन्या राज्यभर सतत बंदोबस्तासाठी बाहेर जात असतात. सध्या यातील अनुक्रमे १०५ व ९२ जवानांच्या दोन कंपन्या बंदोबस्त पूर्ण करून नुकत्याच दौंडमध्ये परत आलेल्या आहेत. या जवानांना क्वारंटाईन करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाच्या दोन्ही गटाच्या प्रमुख समादेशक यांच्याशी चर्चा करून त्यांना नानविज पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्व जवानांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून यातील १५ जवानांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे काल आलेल्या अहवालात समोर आले असून त्यांचेवर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दौंडचे आमदार अॅड.राहुल कुल यांनी नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात जावून भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली. हे जवान सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा करत आहेत त्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले. यावेळी नानाविज पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रोहिदास पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे आदी उपस्थित होते.