हृदयद्रावक : कालव्यात बुडत असलेल्या मुलाला वाचविण्यास गेलेल्या पती-पत्नीचा बुडून मृत्यू! मुलाला वाचविण्यात यश, कुंजीरवाडी जवळील हृदयद्रावक घटना



 लोणीकाळभोर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)

कॅनाॅलच्या पाण्यात वाहून जात असलेल्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या दांपत्याचा करुण अंत झाला असून मुलाला वाचवण्यात यश आले आहे त्या दांपत्यापैकी महिलेचा मृतदेह बाहेर काढला असून पुरुषाचा मृतदेह सापडला नाही त्यासाठी अग्निशामक पथकास पाचारण करण्यात आले आहे. 

पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी गावालगत मुळा मुठा उजवा कॅनाॅल वाहतो. सध्या या कॅनाॅलला उन्हाळी आवर्तन चालू असल्याने दुधडी भरुन वाहत आहे. आज शुक्रवारी दुपारी कुंजीरवाडी येथील एका नर्सरीत काम करणारे उत्तर भारतीय कश्यप दांपत्याचा एक मुलगा या कॅनाॅल मध्ये कडेला पोहताना वाहून जात होता त्याला वाचविण्यासाठी त्याची आई सोनी कश्यप पाण्यात उतरली ती पाण्यात वाहत गेली तिला वाचवण्यासाठी तिचा पती अशोक कश्यप पाण्यात उतरला पण दुर्दैवाने दोघेही खोल पाण्यात बुडाले. लहान मुलास वाचविण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर, पोलिस नाईक नितीन सुद्रीक घटनास्थळी पोहोचले.त्यांनी ताबडतोब अग्निशामक पथकास पाचारण केले. स्थानिक नागरिकांनी तातडीने पाण्यात उड्या मारल्या व महिलेला बाहेर काढले परंतु तिच्या पतीचा मृतदेह सापडला नाही. अशोकचा मृतदेह शोधण्यासाठी अग्निशामक पथकास पाचारण करण्यात आले असून शोधकार्य चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दांपत्य दोन दिवसानंतर आपल्या मूळ गावी  परतणार होते त्यांची परतीची तयारी केली होती आता काळाने अचानक घाला घातल्याने त्यांची चार मुले उघडी पडली आहेत. या घटनेमुळे कुंजीरवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.