विज मंडळातील कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे विज पुरवठा पूर्ववत



लोणीकाळभोर : सहकारनामा ऑनलाईन

पूर्व मोसमी पावसाने पूर्व हवेलीत गोंधळ घातला असून यामुळे शेतीचे मोठे नुकसान तर झाले आहे परंतु याचा मोठा ताण विद्युत मंडळावर पडला आहे. परिसरात अनेक ठिकाणी खांब उन्मळून पडले तर ताराही तुटल्या. त्यामुळे  विज पुरवठा पूर्ववत करताना विज कर्मचार्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

काल शनिवारी सायंकाळी अचानक ढगांची दाटी झाली आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याची तीव्रता जास्त असल्याने उभी पीके आडवी झाली. विशेषतः ऊसाचे मोठे नुकसान झाले. मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विज वाहक तारा तुटल्या व खांब जमीनदोस्त झाले त्यामुळे विज पुरवठा खंडीत झाला. रात्री आठ वाजल्यानंतर पाऊस थांबला त्यानंतर थेऊर येथील उप अभियंता निखील कोंडिलवार यांनी आपले सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ उमेश परदेशी विद्युत सहाय्यक भूषण शिंदे बाह्यश्रोत राहुल केसकर अजय गवळी व मोहम्मद सय्यद यांच्या मदतीने संपूर्ण आढावा घेतला व रात्री पावणेबारा वाजता थेऊर गावचा विज पुरवठा पूर्ववत केला. रात्री अंधारात या विज वाॅरियरांनी अथक परिश्रम करून पुरवठा चालू केला. सध्या कोरोना विरोधात लढा चालू असून प्रत्येक जण आपापल्या परीने यात सहभाग घेतो आहे परंतु आरोग्य, पोलिस, वीज, महसूल यांचे कार्य अधीक महत्त्वाचे ठरत आहे. निखिल कोंडिलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पंधरा खांब पडले असून अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत.उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेची मागणी जास्त आहे. त्यामुळे आम्ही आमच्या परीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.