लोणीकाळभोर : सहकारनामा ऑनलाईन
कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्वत्र लाॅकडाऊन केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळावे यासाठी शासनाने सहाय्य केले आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना आजपर्यंत कोणतीच अडचण येत नसून थेऊर येथील गावकामगार तलाठी दिलीप पलांडे यांनी गावातील प्रत्येक कुटूंबाला धान्य मिळावे यासाठी योग्य नियोजन केल्याने सुमारे दोन हजार कुटूंबाला त्याची मदत झाली आहे.
सध्या शासनाची अन्न सुरक्षा योजने अंतर्गत रु.44 हजार खालील उत्पन्न घटकाला सवलतीत गहू व तांदळाचे वाटप केले जाते. प्रति व्यक्ती दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू दिला जातो. परंतु अनेक कुटूंबाला याचा लाभ मिळत नाही अशा केसरी रेशन धारकाला शासनाने प्रति व्यक्ती दोन किलो तांदूळ तीन किलो गहू दोन महिने सवलतीत देण्याचे जाहीर केले. थेऊर गावातील अशा जवळपास बाराशे कुटूंबाला याचा लाभ मिळाला. गावकामगार तलाठी दिलीप पलांडे यांनी गावातील प्रत्येक कुटूंबाला धान्य मिळावे यासाठी नियोजन करताना जवळपास सातशेहून अधिक कुटूबियाकडे रेशनकार्ड नव्हते अशा कुटूंबांसाठी दानशुर व्यक्तींना आवाहन करुन सातशेहून अधिक धान्याचे कीट वाटप केले. त्यामुळे गावात याचा अनेकांना लाभ झाला. पुढच्या महिन्यात देखील जवळपास सातशे कीट देण्याची तयारी चालू असल्याचे पलांडे यांनी सांगितले. ज्यांना रेशनिंग कार्ड नाही अशा कुटूंबियाची यादी ग्रामपंचायतच्या वतीने तयार करण्यात आली होती. रेशन धारकाला धान्य मिळावे यासाठी त्यांनी येथील प्राथमिक शाळेत सर्व रेशन वाटपाचे नियोजन केल्याने वाटप सुरळीत पार पडत आहे. या वाटपात दोन रेशन दुकानदारांचे सहकार्य वाखाणण्याजोगे आहे.