हृदयद्रावक : बहीण, भावाची निर्घृण हत्या, दिड किलो सोन्यासाठी मारेकऱ्यांनी घेतला बहीण-भावाचा जीव ?



औरंगाबाद : सहकारनामा ऑनलाईन

औरंगाबादमधील सातारा परिसरात एका सोसायटीमध्ये बहिण भावाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर बंगल्यात असलेले दीड किलो सोन्याचे दागिने आणि 6500 अशी रोख रक्कमही चोरीला गेल्याने हे हत्याकांड नेमके चोरीच्या उद्देशाने झाले की अजून कोणत्या कारणाने याबाबत शोध सुरू आहे. औरंगाबादमध्ये असणाऱ्या सातारा परिसरात ही घटना घडली असून किरण लालचंद खंदाडे-राजपूत (वय १८ वर्ष ) आणि सौरभ लालचंद खंदाडे-राजपूत (वय १६ वर्ष) अशी हत्या झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सातारा परिसरातील कनकोरबेननगरमध्ये लालचंद खंदाडे हे आपली पत्नी, दोन मुली सपना, किरण आणि मुलगा सौरभ यांच्यासह राहत होते. मंगळवारी सकाळी या मुलांची आई आणि मोठी बहीण सपना हे कारने पाचनवडगावला गेल्याने मुलगी किरण आणि मुलगा सौरभ हे बंगल्यावर थांबले होते. विशेष म्हणजे दुपारी साधारण सव्वा एकच्या आसपास मुलगी किरण आणि तिच्या आईचा फोनही झाला होता. रात्रीच्या सुमारास ज्यावेळी लालचंद यांची पत्नी, मुलगी सपना आणि सासू औरंगाबादला परतले तेव्हा त्यांनी मुख्य दरवाजातून मुलांना आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतिसाद येत नसल्याचे पाहून त्यांनी बंगल्यात प्रवेश केला तेव्हा त्यांना आतमध्ये किरण आणि सौरभ यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यावेळी किरण हिच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार करून तर सौरभ याचा धारदार शस्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यावेळी घरातील दीड किलो सोन्याचे दागिने आणि रोख 6500 रुपये चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ .राहुल खाडे, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाले, गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली . सौरभने दहावीची परीक्षा दिली होती तर किरण ही पुण्यातील मॉर्डन कॉलेजमध्ये बी ए प्रथम वर्षात शिकत असल्याची माहिती समोर आली.