पुणे : सहकारनामा ऑनलाईन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात आणि राज्यात लाॅकडाऊन सुरू असतानाही लॉकडाऊनचा नियम मोडून अकरावीची पुनर्परीक्षा घेणाऱ्या महाविद्यालयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी छापा मारून कारवाई केली आहे.
हा प्रकार तळेगाव दाभाडे येथील पंचवटी काॅलनीतील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्टचे ज्युनिअर काॅलेज ऑफ सायन्स अँड काॅमर्समध्ये घडला असून लाॅकडाऊन आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करुन अकरावीची पुनर्परीक्षा घेतल्याने ही कारवाई करण्यात आली असून मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा आपत्ती निवारण अधिकारी यांच्याही आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळ, प्राचार्य आणि संबंधित शिक्षक अशा एकूण चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे,तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासकीय एस.एम.गावडे यांनी केली आहे. ही परीक्षा सुरू असताना तेथे तब्बल २७ विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारने आवाहन करूनही असे प्रकार होत असल्याने या कारवाईला महत्व प्राप्त झाले आहे.