..अन्यथा ‛दौंड’ शहरामध्ये कठोर संचारबंदी लागू होणार



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड शहरातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात बदल करून ते रुग्ण अढळलेल्या क्षेत्रांपुरते मर्यादित ठेऊन इतर भागामध्ये शिथिलता देण्याची कार्यवाही करण्यात आली होती परंतु प्रशासनाद्वारे वारंवार आवाहन करूनही शहरात अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे, कंटेनमेंट झोनच्या नियमांचे  पालन होत नसल्याचे आढळून येत आहे त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून सोशल डिस्टंसिंगचे कटाक्षाने पालन न केल्यास पुन्हा शहरात कडक संचारबंदी करण्यात येईल असा इशारा प्रशासकीय बैठकीमध्ये देण्यात आला आहे. याबाबत आमदार राहुल कुल यांनी दौंडच्या नागरिकांनी कोरोनाच्या लढ्यात गंभीर होऊन नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करण्याची विनंतीही जनतेला केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये दौंड नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले रुग्ण आढळून येत आहेत. यातील काही रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. याला आता कुठेतरी पायबंद घालण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी दौंड येथे याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांसह विविध  प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये दौंड नगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, पोलीस विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांचा आढावा  घेण्यात आला तसेच वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर आवश्यक असणाऱ्या कोविड टेस्ट किट, सार्वजनिक आरोग्य केंद्रातील PPE किट, N ९५ मास्क ची योग्य प्रमाणात उपलब्धता, कोविड सेंटर, संस्थात्मक विलगीकरण येथील सुविधांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश आमदार कुल यांनी दिले. यावेळी आमदार कुल यांनी शहरातील झोपडपट्टी व प्रतिबंधक क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक घरांमध्ये सॅनीटायझरचे वाटप करण्याचे नियोजन केले असून, दौंड शहरातील कोविड सेंटर अपुरे पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून यवत ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचाराची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समोर आली. प्रवाशांबाबत काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर रेल्वे स्थानकात सध्या आठ गाडयांना थांबा आहे या गाड्यांमधून रात्री व पहाटे उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे व योग्य काळजी घेणे, नगरपालिके द्वारे प्रत्येक घरात मास्क वितरण करावे आदी तसेच शहारात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना करण्यात आली.  दौंड शहरात आढळलेल्या बहुतांशी रुग्णांना तालुक्याबाहेरील व्यक्तींच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळणे व  सोशल डिस्टंसीगचे कटाक्षाने पालन करण्याचे  आवाहन आमदार कुल यांनी केले. या बैठकीमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल,  तहसीलदार मा. संजय पाटील, मुख्याधिकारी मा.मंगेश शिंदे, गटविकास अधिकारी मा.गणेश मोरे, नगराध्यक्षा मा.सौ शितलताई कटारिया, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे ,दौंड नगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.