राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण महासंघाचे पुण्यात आंदोलन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाच्या  प्रादुर्भावामुळे मागील तीन महिन्यापासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे खुली करण्यात यावी या मागणीसाठी ब्राह्मण महासंघाने पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन केले. राज्यात लॉकडाऊनचे चार टप्पे पूर्ण झाले. चौथ्या टप्प्यानंतर राज्यातील अनेक व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. परंतु सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळाबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. केंद्र शासनाने जारी केलेल्या सुचनात आठ जून पासून मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली होती. परंतु अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोपवला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने अद्याप धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली नाही. 

यावेळी बोलताना ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे म्हणाले, कोरोनामुळे भारतातील संपुर्ण व्यवहार बंद असताना आम्ही काही बोललो नाही. पण आता देश अनलॉक होण्यास सुरुवात झाली. नियम व अटी पाळून राज्यातील 80 टक्क्याहुन अधिक व्यवहार सुरळीत झाले आहेत. मंदिरावर फक्त पुरोहित वर्ग अवलंबून नाही तर फुलवाले, हार विक्रेते, प्रसाद विक्रेते अशा सर्वांचे आर्थिक उत्पन्न थांबलेले आहे. अशावेळी सरकारने अधिक कठोर नियम घालून द्यावेत, संख्येची मर्यादा घालून द्यावी आणि सकाळ संध्याकाळ दोन दोन तास तरी मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन केले. 

राज्यात दीडशे ठिकाणी अशाप्रकारे आंदोलनं केल्याचा दावाही आनंद दवे यांनी केला आहे. तसेच सरकार आमच्या मागण्यांचा सकारात्मक रित्या विचार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला