पुणे : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
सुमारे दोन वर्षापूर्वी कुरकुंभ ता.दौंड येथील एका बेरोजगार युवकास नितीन तानाजी जाधव रा.कल्पनानगर, बारामती व आकाश काशिनाथ डांगे रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा यांनी आयएनएस शिवाजी लोणावळा येथे इंडीयन नेव्हीमध्ये स्टोअर किपरची नोकरी लावतो असे आमिष दाखवून आकाश डांगे याने तो इंडीयन नेव्हीमध्ये नेमणुकीस नसताना सुद्धा इंडीयन नेव्हीचा ड्रेस घालून अधिकारी आहे असे भासवून दोघांनी त्या तरुणाकडून भिगवण व लोणावळा येथे एकुण ३ लाख ८० हजार रूपये घेवून आयएनएस शिवाजी लोणावळा या नावाचे बनावट ई मेलवरून इंडीयन नेव्हीचे बनावट नियुक्ती पत्र, अॅडमीट कार्ड पाठवून नोकरी न लावता त्या तरूणाची तसेच त्याचेसारखे अनेक बेरोजगारांची फसवणूक केलेली आहे.
त्याबाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि.नं.३०४/२०२० भा.दं.वि.कलम ४१९, १७०, ४६७, ४६८, ४७०, ४७१ प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील फिर्यादी किशोर दादा जाधव रा.कुरकुंभ ता.दौंड जि.पुणे हा तरुण नोकरीचे आमिषाने फसवणूक झालेने पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील यांना भेटला व फसवणूकीचा झालेला प्रकार सांगितला. सदर प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी चौकशी करून माहिती घेतली असता सदर तरुणासह इतर अनेक बेरोजगार तरुणांची सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची व यामागे मोठे बोगस रॅकेट असल्याची माहिती मिळाली. त्या दोन ठगांनी अनेक बेरोजगार युवकांची फसवणूक करून त्यांचे आयुष्य धुळीस मिळवले होते.
सदरचे प्रकरण हे देशाचे सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचे असल्याने तात्काळ पुणे ग्रामीणचे गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमून तपासास सुरुवात केली. सदर पथकाने गुन्हयाची माहिती घेवून बारामती येथून आरोपी नामे नितीन तानाजी जाधव वय ३० वर्षे रा.कल्पनानगर, बारामती यास ताब्यात घेवून त्याचेकडे मिळालेल्या माहितीनुसार रॅकेटचा मुख्य सुत्रधार आकाश काशिनाथ डांगे वय २५ वर्षे रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा यास फलटण येथून ताब्यात घेतले. दोघांकडे प्राथमिक चौकशी केला असता त्यांनी पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा, वाशीम, जळगाव तसेच मराठवाडा विदर्भ जिल्हयातील दहावी, बारावी शिक्षण झालेल्या बेरोजगार तरूणांना तेथील ओळखीचे एजंटमार्फत इंडीयन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी २ ते ४ लाख याप्रमाणे कोट्यावधी रूपये घेवून फसवणूक केल्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे भिगवण पोलीस स्टेशनला दाखल झालेले फसवणुकीचे गुन्हयात दोघांना अटक करण्यात आलेली आहे.
गुन्हयाचा पुढील अधिक तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जीवन माने हे करीत होते. परंतु सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा व त्याची व्याप्ती महाराष्ट्रभर असल्याने पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असून गुन्हे शाखेचे पथकाकडून तपास चालू आहे. सदर गुन्हयात आरोपींचे आणखीन साथीदार निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सदर तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश चव्हाण, पो.हवा.अनिल काळे, रविराज कोकरे, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, रौफ इनामदार, सचिन गायकवाड, पो.ना. सुभाष राऊत, गुरूनाथ गायकवाड, संतोष सावंत, अक्षय नवले यांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे.
आकाश डांगे याने अल्प कालावधीच बेरोजगार युवकांना गंडा घालून कोट्यावधी रुपयाची माया गोळा केली होती. काही वर्षांपूर्वी गरीबीत दिवस काढलेला आकाश डांगे हा फलटण पंचक्रोशीत फॉरच्युनर, वेरना या आलिशान गाडया फिरवत पैशाची उधळण करीत होता. नुकताच त्याने मोठा अलिशान बंगला बांधला होता. त्याचेकडे एवढा पैसा अचानक कोठून आला? याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. परंतु हा महाठग आहे याची कोणाला कल्पनाच नव्हती..
सैन्यदलात नोकरीचे आमिषाने फसवणूक झालेले बेरोजगार तरुण आपल्याला नोकरी मिळेल किंवा आपण दिलेले पैसे आज उदया परत मिळतील या खोट्या आशेने पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.
” जाहिर आवाहन “
बेरोजगार तरूणांकडून *”भारतीय सैन्यदलात तसेच इंडीयन नेव्ही”* मध्ये नोकरी लावण्यासाठी लाखो रूपये घेवून त्यांची फसवणूक केलेबाबत *तोतया नेव्ही अधिकारी आकाश काशिनाथ डांगे वय २५ वर्षे रा.भाडळी बु॥ ता.फलटण जि.सातारा व त्याचा साथीदार नितीन तानाजी जाधव वय ३० वर्षे रा.कल्पनानगर, बारामती* या दोघांवर पुणे ग्रामीण जिल्हयात भिगवण पोलीस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा करण्यात आलेला असून तपास स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण हे करीत आहेत.
तरी सदर आरोपींनी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पाषाण रोड, पुणे (फोन नं.020-25651353) येथे संपर्क साधावा.
बेरोजगार तरूणांनी सैन्यदलात व इतर सरकारी नोकरीस लावतो या अमिषाला बळी न पडता स्वतःची फसवणूक टाळावी.