मुंबई : सहकारनामा ऑनलाइन
राज्यात कोरोनाने उग्र धारण केल्यानंतर राज्यात लॉकडाऊनच्या काळामध्ये सलून आणि जिम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सलून आणि जिम सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवडयाभरात राज्यातील जिम आणि सलून काही अटींवर सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे.
याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सलून आणि जिम लवकरच सुरू होईल अशी माहिती दिली आहे. लॉकडाउनमध्ये सलून बंद असल्याने नाभिक समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट बनली होती. त्यामुळे सलून चालू करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनाला भाजपने देखील पाठिंबा देत सलून व्यावसायिकांना त्यांचा व्यावसाय सुरू करू द्यावा अशी मागणी सरकारकडे केली होती. अखेर राज्य सरकारनं देखील आठवडाभरात काही अटी व शर्तींवर राज्यातील जिम आणि सलून चालू करण्यास परवानगी दिली आहे.