पुणे/दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या महामार्गावर दरोडा टाकून लुटणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत LCB पथकातील पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हि कारवाई पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उप निरीक्षक अमोल गोरे, सहा.फौज. दत्तात्रय गिरीमकर, दयानंद लिमण, पो.ना.राजू मोमीन, जनार्दन शेळके, पो.हवा.महेश गायकवाड, उमाकांत कुंजीर, मुकुंद अयाचित, मोरेश्वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना.विजय कांचन, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, गुरू जाधव, रौफ इनामदार, पो.काॅ.धिरज जाधव, पो.ना.प्रमोद नवले, चा.पो.हवा.सावंत, अक्षय जावळे यांचे पथकामार्फत करण्यात आली यावेळी आरोपींना पकडण्यासाठी शिरूर पोलीस स्टेषनचे पो.नि.श्री.प्रविण खानापुरे, स.पो.नि.काबुगडे, पो.काॅ.जितेंद्र मांडगे, सुदाम खोडदे, कल्पेष राखुंडे यांचीही मदत झाली.
कंटेनर लुटणारे सात आरोपींना शिताफीने ऊसाचे शेतातून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे 1) दिनेश वासुदेव झाला वय 50 वर्षे रा. टांेक कला, तालुका टोंक खुर्द, जि. देवास, 2) सुशील राजेंद्र झाला, रा. टोंककला, ता. टोंक खुर्द, जि. देवास , 3) मनोज केशरसिंग गुडेन, रा.ओढगाव, ता. सोनकछ, जि. देवास, 4) मनोज उर्फ गंजा राजाराम सिसोदिया, रा. भैरव खेडी जि. देवास, 5) ओमप्रकाश कृष्णा झाला, रा. भैरव खेडी ता. टोंक खुर्द, जि.देवास, 6) कल्याण सदुल चैहान, रा ओढ, तालुका सोनकछ, जिल्हा देवास, 7) सतिष आंतरसिंग झांजा, रा.ओडगाव, ता.सोनकछ,जिल्हा देवास, राज्य मध्यप्रदेश अशी असून या संपुर्ण कारवाईदरम्यान रू 4,51,58,400/- किंमतीचे सिगारेट, रू. 13,600/- रोख रक्कम, 6 मोबाईल फोन, 2 ट्रक, 1 बनावट रिव्हाॅल्व्हर, डुप्लीकेट नंबर प्लेटचे अंक व नंबर, एक चाॅपर, एक चाकु असा किंमत रू. 4,91,79,500/- असा माल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार या टोळीने यवत (ता. दौंड) जवळ रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी कंपनीचा सिगारेटचा कंटेनर लुटला होता. यानंतर पोलिसांनी अतिशय नियोजनबध्द पद्धतीने तपास करून या आरोपींच्या मुसक्या आवळत या कारवाईत तब्बल 4 कोटी 91 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 4 कोटी 51 लाख 58 हजार 400 रुपये किमतीचे 13,600 सिगारेट बॉक्स जप्त करण्यात आले. त्याचबरोबर 14 हजार रोख रक्कम, 6 मोबाईल, 2 ट्रक, 1 बनावट रिवॉल्व्हर, डुब्लिकेट नंबर प्लेट, एक चॉपर चाकू असा तब्बल 4 कोटी 91 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी सुपे ते मोरगाव या परिसरात सिगारेटचा एक कंटेनर हायजॅक केला होता त्यानंतर आरोपींनी हा सर्व माल आपल्या ट्रकमध्ये घालून पोबारा केला होता. कंटेनर चालकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्याला टेंभुर्णी येथे सोडून देऊन कंटेनरमधील माल लुटला होता. याबाबतची माहिती पुणे ग्रामीण च्या LCB पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरु केला. पाठलागादरम्यान यातील एक ट्रक ट्रॅफिकमध्ये अडकला. यानंतर या ट्रकमधील आरोपी उड्या मारुन पळून गेले. तर दुसऱ्या ट्रकमधील आरोपी रस्त्याचा दुभाजक तोडून पळून गेले. अखेर पोलिसांनी पाठलाग करुन 7 आरोपींना जेरबंद केलं. या टोळीने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, ओडिसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये लूट केल्याचे समोर येत आहे. या टोळीवर आतापर्यंत 11 गुन्ह्यांची नोंद असून साधारण 33 कोटींचा माल त्यांनी आत्तापर्यंत लुटल्याचा संशय आहे. महामार्गावर लूटमार करणारी ही टोळी मध्यप्रदेशच्या देवास जिल्ह्यातील असून दिनेश झाला नामक इसम हा या टोळीचा म्होरक्या आहे. गुन्हा करताना आरोपी नियोजनपद्धतीने व्यूहरचना आखत होते आणि प्रत्येक गुन्हा करताना मोबाईल आणि सिम कार्ड एकदाच वापरत होते. लूटमार केल्यानंतर ते मोबाईल आणि सिम नष्ट करुन ते पसार व्हायचे त्यामुळे पोलिसांना तपास करताना सिम कार्ड वेगवेगळ्या राज्यातील असल्याने नेमके धागेदोरे सापडत नव्हते. तब्बल दहा वर्षांपासून हे असे सुरू असल्याचे समोर येत आहे. LCB पथकाने केलेल्या या कारवाईनंतर मोठं रॅकेट हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.