केडगाव, बोरीपार्धी, पाटसच्या 35 जणांचा कोरोना रिपोर्ट आला डॉक्टरांच्या हाती, नागरिकांनी कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी, पाटसच्या 35 जणांचा कोरोना अहवाल आला असून या अहवालामध्ये सर्व 35 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी ‛सहकारनामा’ ला दिली असून नागरिकांनी कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अनेकवेळा नागरिक बिनधास्त होऊन सर्रास नियम मोडून एकत्र जमतात आणि कोरोनाला आमंत्रण देतात हे आत्तापर्यंत घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी आणि  पाटसमध्ये कोरोनाच्या झालेल्या फैलावामुळे आणि कोरोना बधितांच्या संपर्कात आल्यामुळे या सर्व 35 जणांची कोरोना चाचणी काल करण्यात आली होती या चाचणीमध्ये हे सर्वजण निगेटिव्ह आले असल्याने या तिन्ही गावांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या केडगावमध्ये 9, बोरीपार्धीमध्ये 4, वरवंडमध्ये 1, आणि पाटसमध्ये 4 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.