दौंड तालुक्यात ‛कोरोना योद्ध्यांनाच’ केले ‛अफवेकऱ्यांनी’ टार्गेट, डॉक्टरांना त्रास दिल्यास मिळणार जशास तसे उत्तर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

कोणत्याही माणसाला कधीही, कोठेही, आणि कितीही वाजता जाऊन मदत करणाऱ्या डॉक्टरांनाच आता अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आपल्या जीवाची पर्वा न करता दवाखान्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला ‛मानव सेवा परमोधर्म’ हे ब्रीदवाक्य अंगीकारून त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कधी कधी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक डॉक्टरांना मानव सेवा करताना कधी कधी रुग्णाला बरे करण्याच्या नादात मोठी किंमत चुकवावी लागते.

असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातही घडला होता. मात्र या कोरोना योद्ध्यांना आत्मविश्वास आणि प्रोत्साहन देण्याऐवजी काहींनी मात्र या कोरोना योद्ध्यांनाच त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. दौंड तालुक्यामध्ये सध्या अशाच अनेक कोरोना योद्धा डॉक्टरांना टार्गेट   केले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत दौंड तालुक्यातील केडगाव, वरवंड, पाटस येथील अनेक डॉक्टरांनी तीव्र संताप व्यक्त केला असून गाव पातळीवर असणारे काही स्वयंघोषित गाव पुढारी, त्यांचे टवाळखोर मित्र आणि अनेक टोळभैरव सध्या डॉक्टरांविरुद्ध जाणून बुजून अफवा पसरवित असल्याचे डॉक्टरांच्या बोलण्यातून समोर येत आहे. त्यामुळे या टवाळ खोरांवर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.

काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील केडगाव आणि पाटस परिसरातील काही डॉक्टरांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती त्यानंतर त्यांनी स्वतः होऊन आपली कोरोना टेस्ट करवून घेत पुण्यात असणाऱ्या खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेतले. या डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर काही डॉक्टर घरीही परतले. मात्र ज्या डॉक्टरांना कोरोना झालाच नाही अश्या डॉक्टरांबाबतही या तिन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरविल्या गेल्या आणि त्यांना नाहक नाहक त्रास देत बदनाम करून त्यांना उचला, घरातील लोकांनाही उचला आणि रुग्णालयात पाठवून द्या अशा पद्धतीने षडयंत्र केले गेले असा आरोप अनेक डॉक्टरांनी केला आहे. या अफवांमुळे या गावांमध्ये असणाऱ्या अनेक डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता हे सर्व  डॉक्टर या अफवेकऱ्यांच्या विरोधात आक्रमक झाले असून या अफवेकाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

डॉक्टरांना कुणी त्रास दिल्यास जशास तसे उत्तर देऊ : डॉ.धिरेंद्र मोहन

याबाबत केडगावचे जेष्ठ डॉक्टर धिरेंद्र मोहन यांनी या अफवेकऱ्यांना इशारा दिला असून गाव पातळीवर असणाऱ्या डॉक्टरांना कुणी त्रास दिला किंवा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर देऊ आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असा इशारा सहकारनामा’शी बोलताना दिला आहे.