थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)
पूर्व हवेलीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येत असून ग्रामपंचायत व पोलिस प्रशासन हे संयुक्तिक कारवाई करत आहेत. नियमाचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात असून थेऊर पोलिस मदत केंद्राचे अंतर्गत आज तब्बल 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर 35 जणांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी दिली.
पूर्व हवेलीतील गावामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने हवेलीचे प्रांत अधिकारी सचिन बारवकर यांनी लोणी काळभोर येथे बैठक घेऊन ग्रामपंचायत महसूल विभाग पोलिस प्रशासन यांना नियम मोडणार्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर आज सकाळपासून ग्रामपंचायत पातळीवर कारवाई चालू झाली तर पोलिसांनी मास्क न वापरणार्या व विनाकारण भटकणार्यांवर कारवाई केली. थेऊर मदत केंद्रातर्गत येत असलेल्या थेऊर व कुंजीरवाडी गावातील एकुण पस्तीस ग्रामस्थांवर मास्क न वापरल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली तर इतर दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी जबाबदारीने वागून शासनास सहकार्य करावे आपले व आपल्या समाजाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.