पेट्रोल-डिझेल दरवाढीचा दौंड काँग्रेसकडून निषेध, तहसीलदारांना दिले निवेदन



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल दरात केलेल्या अन्यायकारक दरवाढी विरोधात दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि.२९ रोजी निषेध नोंदविण्यात आला.  यावेळी पक्षाच्या वतीने तहसीलदारांना दरवाढी विरोधात निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे नमूद केले आहे की, करोना सारख्या महामारीच्या काळात गेल्या तीन महिन्याच्या लॉकडाऊन नंतर सर्व व्यवहार सुरळीत चालू असताना गेल्या पंधरा दिवसात पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढले आहेत. याचा फटका सर्व सामान्यांना, शेतकरी व व्यापारी वर्गाला बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी  झाल्‍या असतानाही केंद्र सरकार कच्च्या तेलावर 28% विविध कर गोळा करत आहे. कच्च्या तेलाला जीएसटी मध्ये समाविष्ट करून एक देश एक कर या तत्त्वानुसार कच्च्या तेलाचे भाव स्थिर ठेवावेत तसेच सध्या वाढलेली दरवाढ मागे घेण्यात येऊन सर्वसामान्य नागरिकांना सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी पक्षाचे शहराध्यक्ष हरेश ओझा, युवा अध्यक्ष अतुल जगदाळे ,महेश जगदाळे अतिश जगताप ,विठ्ठल शिपलकर ,अतुल थोरात, रज्जाक शेख आदि पदाधिकारी उपस्थित होते.