देऊळगावराजे : सहकारनामा ऑनलाइन (प्रशांत वाबळे)
दौड़ तालुक्यातील पूर्व भागामध्ये सुरू झालेल्या पावसामुळे तोंडाशी आलेली पिके सडुन गेली असून त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील स्थानिक शेतकरी बाळकृष्ण पाचपुते यांच्या तोडणीस आलेले सात ते आठ एकर खरबूज ,टोमँटो पावसामुळे सडुन गेल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दौंड तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी होत असली तरी संबंधित विभागाकडून पंचनामे सुरु झाले नसल्याने या भागातील नुकसाग्रस्त शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक भरपाईच्या आशेवर बसला आहे.
या पावसाने पूर्व भागात असणाऱ्या अनेक गावातील पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आधी कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. राज्य शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.
दौंड तालुक्यातील पूर्व भागातील शिरापूर , देऊळगावराजे ,आलेगाव,खोरवडी ,बोरीबेल , काळेवाडी, वडगाव ,पेडगाव इत्यादी गावातील पिके जमीनदोस्त झाली आहेत अनेक ठिकाणी शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे कांदा ,ऊस, कलिंगड, खरबूज, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, ढोबळी, मिरची, मका इत्यादी दोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. येथील फळबागांना अधिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करुन आर्थिक मदत मिळावी अशी मागणी येथील शेतकरी करत आहे.