थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)
पूर्व हवेलीतील कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना या रोगावर मात करुन घरी परतलेल्या रुग्णाचे स्वागत डि जे लाऊन त्याच्या तालावर नाचून करण्यात आले मात्र यादरम्यान नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सोळा जणाविरुध्द लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे याची फिर्याद पोलिस नाईक गणेश कर्चे यांनी दिली आहे.
कोरोनाचा कहर असताना ही संक्रमणाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणासमोर असताना नागरिकांकडून मात्र सहकार्य मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. लोणी काळभोर येथील एका माजी ग्रामपंचायत सदस्यास कोरोनाची लागण झाली होती त्याच्यावर दहा दिवसापूर्वी हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. दि.1 जुलै रोजी या आजारातून बरे झाल्याने त्यास घरी सोडण्यात आले परंतु त्याने आपले नातेवाईक व मित्र मंडळी यांसह डि जे लाऊन डांस करत विजय साजरा केला. यावेळी तोंडावर मास्क नव्हते व सोशल डिस्टंसिंगचा नियम पायंदळी तुडवला. विशेष म्हणजे याचा एक व्हिडिओ तयार करुन सोशल मिडियावर प्रसारित केला. सध्या लोणी काळभोर परिसरात दररोज नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे अशावेळी हे अती साहस किती महत्त्वाचे आहे हा प्रश्न उपस्थित होतो.