दौंड तालुक्यातील प्रसिद्ध शेतकऱ्याची सायबर भामट्यांकडून फसवणूक, ATM कोडवरून खात्यातील 90 हजार रुपये केले लंपास



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथील प्रसिद्ध शेतकऱ्याची मोबाईल फोनवरून ATM कोड माहिती करून घेऊन सायबर भामट्यांनी सुमारे 90 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत प्रसिद्ध शेतकरी उत्तमराव ताकवले (रा.गलांडवाडी ता.दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०६ जुलै रोजी दुपारी ०२:४२ वाजता त्यांच्या मोबाईल फोन नंबरवर अनोळखी नंबर वरून फोन आला व समोरून एका अनोळखी व्यक्तीने मी अॅक्सीस बँकमधुन बोलत आहे. आम्ही तुम्हाला एक क्रेडीटकार्ड पाठविले आहे. ते तुम्हाला मिळाले आहे का असे विचारले असता ताकवले यांनी त्यास क्रेडीटकार्ड मिळाले आहे असे सांगितले यावेळी त्या इसमाने मला क्रेडीटकार्ड  नंबर सांगा असे म्हणाले असता ताकवले यांनी त्यांचा क्रेडीटकार्ड त्यास दिला यावेळी त्या भामट्याने क्रेडीटकार्डचे पाठीमागे असणारा तीन अंकी नंबर आणि ओटीपी नंबर त्यांच्याकडून घेतला.  या नंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवर अॅक्सीस बँकेचे तीन संदेश आले. त्यामध्ये अनुक्रमे ४०,३४९/- रू. ४१,४१०/-रु. आणि ७,५००/- रू. असे एकूण ८९ हजार २५९ रुपायी त्यांच्या क्रेडीट खात्यामधुन कट झाले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांची खात्री झाली की  मोबाईल फोननंबरवर अनोळखी इसमाने त्यांची खोटे बोलून सुमारे 90 हजारांची फसवणूक केल्याची फिर्याद त्यांनी यवत पोलीस दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.