पुणे : सहकारनामा ऑनलाईन
करोना, लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरी बसून ई-साहित्याच्या मदतीने अभ्यास करता यावा, यासाठी त्यांना शैक्षणिक ई-साहित्य उपलब्ध करुन देण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने ई-साहित्य निर्मिती स्पर्धा घेण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. या स्पर्धेत भारतीय जैन संघटना विद्यालयातील गणित विषय शिक्षक संदिप पोपट लोणकर यांना पुणे जिल्ह्यतून द्वितीय क्रमांक मिळाला.
शिक्षक संदीप लोणकर हे बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील रहिवासी आहेत. इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षण प्रक्रियेस पूरक शैक्षणिक ई-साहित्य निर्मिती व त्याचा वापर करण्यात येणार आहे. शाळेमध्ये शिक्षकांना उपयोगी ठरेल व विद्यार्थी घरी असताना त्यांचा अभ्यास घेण्यासाठी पालकांना सहाय्यभूत ठरेल असे ई-साहित्य निर्मितीसाठी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्याने नियोजन केले आहे.
मराठी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या, शासन मान्यता प्राप्त शाळांमधील मान्यता प्राप्त शिक्षकांसाठी ई-साहित्य निर्मिती स्पर्धा खुली होती. स्पर्धेसाठी ऑनलाइन नावनोंदणी करण्यात आली होती. ई-साहित्याची तालुका व जिल्हास्तरवर छाननी व परीक्षण करण्यात आले. आकर्षक मांडणी, विद्यार्थी कृतीवर भर, मनोरंजकता, संकल्पना, आकलन, सुलभता, तांत्रिक दृष्टया अचूकता या निकषावर गुणदानही करण्यात आले. यामध्ये इयत्ता 9वी -10वी शिक्षकांच्या व्हिडिओ निर्मिती गटांमध्ये जिल्हास्तरावर संदिप लोणकर यांना द्वितीय क्रमांक मिळाला. त्याबद्दल लोणकर सरांचे बी.जे. एस. चे सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच प्राचार्य संतोष भंडारी, उपप्राचार्य दिलीपकुमार देशमुख, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले.