दौंड नगरपालिकेतील सहा कर्मचारी विलगिकरणात, पुण्याहून रुग्णांचा अहवाल येण्यास तीस तासा पेक्षा लागतोय जास्त वेळ



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

करोना बाधित रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तींना विलगीकरण करण्याचे काम करणाऱ्या नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचेच विलगीकरण झाले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नगरपालिकेचे मुख्याअधिकारी हे सुद्धा गेले तीन दिवस नगरपालिकेत येत नसल्यामुळे करोना महामारीच्या संकटसमयी नगरपालिकेमध्ये जबाबदारीचे निर्णय घेण्यासाठी अधिकारी नाही व  त्यात शहरांमध्ये  रोज  रुग्णांची  संख्या  वाढतेच आहे. त्यामुळे दौंडकरांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे असे चित्र दिसते आहे. हे सर्व कर्मचारी सोमवार पर्यंत विलगीकरणत असल्यामुळे त्यांची कामे करणार कोण हा  प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये महामारीचा शिरकाव होतो आहे. ज्या भागामध्ये बाधित रुग्ण आढळतील तो भाग नगरपालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण केले जाते. परंतु विलगीकरण केलेल्या व्यक्ती सर्रास पणे शहरात फिरताना आढळतात. कारण अशा व्यक्तींवर कोणीही लक्ष देत नाही. व या  बेजबाबदार लोकांमुळे करोनाचा संसर्ग सर्वत्र पसरतो आहे व शहरातील रुग्णसंख्या वाढतच आहे. लोकांचे विलगीकरण करणे साठींच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे त्यामुळे ज्या प्रभागातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाला  आहे तेथील नगरसेवकांनी स्वयंसेवकाची टीम बनवून येथील विलगीकरण झालेल्या व्यक्ती घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घ्यावी तरच संसर्गाची साखळी तुटेल असे स्थानिकांचे मत आहे. शहरात रोज असंख्य लोकांचे विलगीकरण करावे लागत आहे. परंतु विलगीकरण करण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने या  लोकांपर्यंत पोहोचण्यास नगरपालिका कर्मचाऱ्यांना उशीर होतो आहे आणि या मधल्या वेळेत बाधित रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्ती इतरांच्या संपर्कात येत आहेत त्यामुळे या महामारीच्या संसर्गाची वाढ वेगाने होत आहे. या या व्यक्तींना वेळेतच विलगीकरण करण्यासाठी नगरपालिकेने कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे अत्यंत गरजेचे आहे असे नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनीच नाव न छापण्याच्या अटी वर सांगितले आहे.