इंदापूर : सहकारनामा ऑनलाईन
वाटप झालेल्या जमिनीची नोंद तहसील कार्यालयातील रजिस्टरला करण्यासाठी तहसील कार्यालयातील लिपिकाने 2 हजारांची लाच मागून त्यापैकी 1 हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही घटना इंदापूर जि.पुणे येथील तहसील कार्यालयात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (वय 35) असे या लिपिकाचे नाव असून याप्रकरणी इंदापूर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नितेशकुमार हे इंदापूर तहसील कार्यालयात लिपिक पदावर काम करत होते. एक शेतकरी ज्याच्या जमिनीचे महाराष्ट्र जमिनी महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप झाले आहे त्याची नोंद तहसील कार्यालयाच्या रजिस्टर वहीत करायची होती. मात्र याबाबत तक्रार दराने वेळोवेळी हेलपाटे मारूनही त्या कार्यालयातील लिपिक नितेशकुमार यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. रक्कम छोटी असली तरी लाच का द्यायची असा प्रश्न तक्रारदारास पडल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्याची पडताळनी केली असता त्यामध्ये लोकसेवक लिपिकाने लाचेची मागणी केल्याचे व 1 हजार रुपये तडजोड करून घेत असल्याचे दिसताच ACB कडून त्यांना रंगेहात पकडण्यात आले.