पुण्यात हत्या सत्र सुरूच, तरूणावर गोळीबार करत कोयत्याने वार करून ‛खून



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुणे शहरामध्ये हत्यांपर्व सुरूच आहे. रात्री पुणे शहरातील पर्वती येथे असणाऱ्या शाहूनगर वसाहतमध्ये एका युवकावर गोळीबार करून कोयत्याच्या सहाय्याने त्याचा खून करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खून झालेल्या युवकाचे नाव अमित मिलिंद सरोदे (वय 21) असे असून तो जनता वसाहत, पर्वती येथे राहत होता. याबाबत त्याचा मित्र सौरभ महेश मोहोळ याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीमध्ये आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांनी खून केल्याचे नमूद करण्यात आले असून या तिघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सौरभ आणि  अमित दि.12 जुलै रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास शाहू वसाहत जवळ रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी आरोपी ननावरे हा त्याच्या साथीदारासोबत त्या ठिकाणी आला. त्याने थेट अमित याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. तसेच, त्याच्या साथीदारांनी अमितच्या मानेवर, डोक्यात कोयत्याने वार केले. पुर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी तोपर्यंत घटनास्थळावरून निघून गेले होते. पोलिसांनी या आरोपींमागे स्थानिक व गुन्हे शाखेची पथके रवाना  केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास घेवारे करत आहेत.

पुणे शहरामध्ये काही दिवसांमध्ये विविध ठिकाणी खून झाले आहेत. हे खून टोळी युद्ध किंवा पूर्व वैमनस्यातून झालेले असल्याने पुणे शहर पोलिसांचा ताण वाढत चालला आहे.