लोणी काळभोर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)
साहित्य क्षेत्रातील एक महान लेखिका व महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे आज कोरोना आजारामुळे मुंबईत निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे साहित्य क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली. नीला सत्यनारायण या 1972 च्या बॅचमधील सनदी अधिकारी होत.
त्यांनी आपल्या हयातीत अनेक मोठी आव्हाने स्विकारली. त्यानी अनेक पुस्तके लिहिली त्यातील त्यांचे ” एक पूर्ण अपूर्ण” हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक खूपच प्रसिद्ध आहे. यात त्यांनी स्वतःचे अनुभव रेखाटलेले आहेत. यातील एक धडा बारावीच्या इंग्रजी पुस्तकात समाविष्ट केलेला आहे. तसेच त्यांची अनेक पुस्तके साहित्य क्षेत्रात गाजली. यापैकी आई बाबांची शाळा (मार्गदर्शनपर) ,आयुष्य जगताना एक दिवस जीवनात (अनुभव कथन), रात्र वणव्याची (कादंबरी), मैत्र (ललित लेख) यांचा समावेश आहे.
त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले यात केंद्र शासनाचा अहिंदी भाषी लेखिका पुरस्कार, राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार,मातृवंदना पुरस्काराचा समावेश आहे.
याच संदर्भातील एक आठवण सांगताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजकुमार काळभोर म्हणाले की नीला सत्यनारायण यांना सन 2014 साली थेऊरफाटा येथे तेजस्विनी परिवारातर्फे तेजस्विनी पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी महान समाजसेविका सिंधूताई सपकाळ सुध्दा उपस्थित होत्या. त्यांनी त्यावेळी सर्व महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. ग्रामीण भागातील महिलांनी दाखवलेल्या कलेचे त्यांनी भरभरुन कौतुक केले होते.