पुणे/दौंड : सहकारनामा ऑनलाईन
येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या पाच आरोपींपैकी एका आरोपीस पकडण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे.
गणेश अजिनाथ चव्हाण (वय.२२ वर्षे रा. बोरावके नगर, दौंड ता. दौड जि. पुणे) असे या आरोपीचे नाव असून त्यास लिंगाळी ता. दौंड येथे सापळा रचून पाठलाग करत पकडण्यात आले आहे. या आरोपीस ताब्यात घेवुन येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांकडे सुपूर्द करण्यात आले.
पुणे शहरात असणाऱ्या येरवडा जेल मधून रात्री खिडकीचे गज कापून पाच कैदी फरार झाले होते. या कैद्यांमध्ये देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण, अजिंक्य कांबळे आणि सनी पिंटो यांचा समावेश होता. यातील तिघे दौंड तालुक्यातील असून यांच्यातील एकास पकडण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे.
या आरोपींचा शोध घेण्यासाठी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी IPS ऐश्वर्या शर्मा दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.डी.महाडीक, सहा.फौजदार डी.जी. भाकरे, पो.हवा.आसिफ शेख, पो.ह.पांडुरंग थोरात, पो.ना.अण्णासाहेब देशमुख, पो.ना.सचिन बोराडे, पो.कॉ.अमोल देवकाते, पो.कॉ.राहुल वाघ, पो.कॉ.अमोल गवळी, पो.कॉ.अमजद शेख, पोकॉ अक्षय घोडके, पो.कॉ.किरण राउत, पो.कॉ.शैलेश हंडाळ, पो.कॉ.अप्पासाहेब करे, होमगार्ड गजानन थोरात, होमगार्ड सौरभ कापरे, पोलीस मित्र सुरज फाळके यांनी मोठी मदत केली.