दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड शहर आणि परिसरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनामुळे
काल पर्यंत येथील उपजिल्हा रुग्णालयाने एकूण 2035 संशयितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी एकूण 215 जणांचे आत्तापर्यंत अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 215 रुग्णांपैकी 147 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 9 कोरोना बधितांचा मृत्यूही झाला असून आज दि.17 जुलै अखेर 59 कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर दौंड शहर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबतची संपूर्ण माहिती दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांनी दिली आहे.
शहरात पसरलेल्या करोना व्हायरसला लगाम घालण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, दौंड नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत व त्यांना यामध्ये चांगले यशही येताना दिसत आहे. शहरात लॉक डाऊन लागू केला असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकानेच खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त खुल्या दुकानांवर नगरपालिका दंडात्मक कारवाई करीत आहे. तसेच शहरात विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर तसेच शहरात विनाकारण दुचाकींवर डबल, ट्रिपल सीट फिरणाऱ्या कडून पोलीस दंड वसूल करीत आहेत. शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांची गस्त सुरू आहे. त्यामुळे दुपारी एक नंतर शहरातील वर्दळ कमी झाल्याचे दिसते आहे. प्रशासनाचे हेच प्रयत्न कामी येऊन शहरातील संसर्ग रोखला जाण्यास मदत होणार आहे. बाधितांची संख्या घटली तरच शहरातील लॉक डाउन उठेल,अन्यथा पुन्हा एकदा कडक लॉक डाउनला दौंड करांना सामोरे जावे लागेल यात शंका नाही.