दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, परंतु तरीही शहरातील रुग्णांची संख्या वाढतच आहे.
दि.२३ जुलै रोजी एकूण ५५ संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 11 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ९ पुरुष व 2 महिलांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.
शहरातील करोना ची साखळी काही केल्या तुटायला तयार नाही अशी परिस्थिती झाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे नगरपालिका कर्मचाऱ्यांना अवघड जात आहे. आणि बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले स्वतःहून तपासणी करून घ्यायला तयार नाही असे शहरातील चित्र आहे.
शहरात महामारीचा संसर्ग वाढतच आहे, त्यामुळे ज्या प्रभागात बाधित रुग्ण सापडतील तेथील नगरसेवकांनी संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांना मदत केली पाहिजे, तरच योग्य वेळी योग्य लोकांची तपासणी होईल आणि त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे.