पुणे : सहकारनामा ऑनलाईन
राज्यामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यातही आहे. मात्र कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही खाजगी रुग्णालयांनी कोरोना ही एक संधी असल्याचे डोळ्यासमोर ठेऊन रुग्णांची लूट सुरू केली आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत गर्भित इशारा दिला आहे.
आता करोनाच्या रुग्णांवर उपचार झाल्यानंतर ज्या खासगी रुग्णालयांकडून उपचार करण्यात आले त्या रुग्णालयांच्या वैद्यकीय बिलांची स्वतंत्र लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रुग्णालयांनी राज्य सरकारने निश्चित केलेल्या दरांनुसारच बिल आकारणी करावी लागणार आहे अन्यथा संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
सध्या कोरोनाच्या रुग्णांवर खासगी रुग्णालयांकडून अधिक पैसे घेतले जातात, भरमसाठ बिल आकारले जाते अशा तक्रारी समोर येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावर भाष्य करत याबाबत सूचना केल्या.
करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.