कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार कुल यांनी घेतली आढावा बैठक



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमदार राहुल कुल यांच्यासोबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.  

यावेळी तालुक्यातील कोरोनाच्या एकूण परिस्थितीचा व सुरु असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा आमदार कुल यांनी घेतला. 

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाउनच्या मर्यादा लक्षात घेता वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी अधिक प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, टेस्टची संख्या वाढविणे, शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स व व्हेंटिलेटर उपलब्ध करणे, रूग्णांवर उपचारासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालयांची मदत घेणे, विलगीकरणासाठी अधिक सुविधा उपलब्ध करणे, विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा पुरविणे आदी सूचना यावेळी आ.कुल यांनी दिल्या . 

या महत्त्वपूर्ण बैठकीस दौंडचे तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे, यवत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर हे आवर्जून उपस्थित होते.