Update News : शासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे दौंड शहरातील खाजगी दवाखाने बदनाम : डॉ.समीर कुलकर्णी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांच्या तक्रारीवरून पिरॅमिड दवाखान्याचे प्रमुख डॉ.समीर कुलकर्णी यांच्या विरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  प्रकरणाबाबत डॉ.समीर कुलकर्णी यांच्याशी आमचे प्रतिनिधी अख्तर काझी यांची बातचीत झाली असता त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकत आपल्यावरील आरोप हे कसे चुकीचे आहेत याबाबत भाष्य केले आहे.

याबाबत डॉ.समीर कुलकर्णी म्हणाले की, तालुक्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ज्या अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती केलेली आहे त्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील प्रशासनाने ताब्यात घेतलेली खाजगी दवाखाने नाहक बदनाम होत आहेत. शहरातील कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने व बाधित रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून प्रशासनाने खाजगी दवाखाने अधिग्रहित केली आहेत, परंतु  सदरचे दवाखाने अधिग्रहित करताना शासनाने दिलेल्या सूचनांचे व पद्धतींचे पालन येथील संबंधित अधिकाऱ्यांनी काडीमात्र केलेले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. 

दवाखाना अधिग्रहित करताना त्या दवाखान्यातील सर्व  सोयी सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाहीत हे पाहून संबंधित  अधिकाऱ्यांनी स्वतः दवाखान्यात येऊन त्याचा ताबा घेतला पाहिजे असे शासनाचे निर्देश आहेत. परंतु आमचा दवाखाना अधिग्रहित करताना कोणताही शासकीय अधिकारी अद्याप याठिकाणी फिरकलेला नाही. कोविड रुग्णांना अशा दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी या दवाखान्यात इतर आजारांवर उपचार  घेणाऱ्या रुग्णांची सोय वेगळ्या ठिकाणी शासनाने करावयाची आहे ती त्यांनी केलेली नाही. आणि  अचानक रात्रीच्या वेळेस तुमचा दवाखाना अधिग्रहित करण्यात आला असल्याची माहिती (आदेश) अधिकारी देतात, हा प्रकार योग्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पिरॅमिड दवाखाना अधिग्रहित केला असल्याचा आदेश मिळाल्यानंतर आम्ही  जिल्हाधिकारी  यांना पत्राद्वारे कळविले होते की, कोरोनाच्या व लॉक डाऊनच्या काळात आमच्या दवाखान्यामध्ये उपचारांसाठी रुग्णांची गर्दी असून ९०% बेड संख्या भरलेली आहे तसेच अतिदक्षता विभागात देखील १००% बेड संख्या भरलेली आहे. कोरोना बाधित रुग्ण ऍडमिट करण्यासाठी व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन,कोविड ट्रेनिंग स्टाफ व तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची  गरज असते यापैकी कुठलेही प्रसाधन पिरामिड दवाखान्याकडे उपलब्ध नाही. कोविड रुग्ण हे विलगीकरण क्षेत्रातच ठेवता येतात, त्यांना इतर सामान्य रुग्णांमध्ये ठेवता येत नाही. तसेच या रुग्णांचे उपचार करण्यासाठी जो नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले जातात, त्यांचे योग्य प्रशिक्षण होणे तेवढेच आवश्यक असते.

पूर्ण प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ नसेल तर रुग्ण व स्टाफ दोघांच्याही जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नर्सिंग व इतर वैद्यकीय स्टाफ चीआवश्यकता असते जे पिरॅमिड मध्ये उपलब्ध नाही. याची पूर्ण कल्पना जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे. असे असताना फक्त आमच्या विरोधातील आंदोलनकर्ते खुश व्हावेत म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात  आला आहे असे शेवटी डॉक्टर समीर कुलकर्णी म्हणाले.