दौंडमधील कोविड सेंटरमध्ये भयानक प्रकार सुरू, नगरपरिषद कडूनही पोलीस बंदोबस्ताची मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहरात असणाऱ्या सुशृषा नर्सिंग स्कुल/उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, येथे कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. या ठिकाणी अनेक रुग्ण उपचार घेत असुन मागील दोन दिवसांपासुन या ठिकाणी अज्ञात इसमाकडुन विजपुरवठा खंडीत करणे, वायरींग तोडून त्यामध्ये बदल करणे, वापराच्या पाण्याचे स्टार्टर/मोटर कनेक्शन मध्ये फेरबदल करणे अशा प्रकारचे भयानक कृत्य केले जात आहे. यामुळे या कोविड सेंटरमधील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

या सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांनी आपल्या नातलगांना व मित्रांना ही बाब सेंटर मधून कळविली आहे. या सेंटरच्या इमारतीमधील वीज पुरवठा अचानक गायब होत आहे. कोविड सेंटरच्या इमारतीला ज्या डीपी मधून वीज पुरवठा घेतलेला आहे, त्या डीपी मधील वीज पुरवठा करणारी वायरच काढून टाकण्यात आली असल्याचा व्हिडिओ रुग्णांनी काढला असून तो त्यांनी मित्रांना पाठविला आहे, तसेच इमारतीमधील पाण्यांच्या टाक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी असणाऱ्या मोटारी बंद पाडल्या जात आहेत. ज्यामुळे इमारतीमधील टाक्या रिकाम्या राहत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांना संडास, बाथरूमसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी इमारतीमधून खाली यावे लागत आहे. याठिकाणी उपचार घेणाऱ्या वृद्ध रुग्णांना तर याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दौंड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडून बंदोबस्थांसाठी पोलीस कर्मचाऱ्याची मागणी..

ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी दौंडचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना पत्र लिहीत पुढील प्रमाणे मागणी केली आहे.

सुशृषा नर्सिंग स्कुल/उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, दौंड येथे कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. या ठिकाणी रुग्ण उपचार घेत असुन मागील दोन दिवसांपासुन या ठिकाणी अज्ञात इसमाकडुन विजपुरवठा खंडीत करणे, वायरींग बदल करणे, वापराच्या पाण्याचे स्टार्टर/मोटर कनेक्शन मध्ये फेरबदल करणे अशा प्रकारचे कृत्य केले जात असलेबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. यामुळे पाण्या अभावी व विजे अभावी रुग्णांची प्रचंड गैरसोय होत असुन त्यांनी केलेल्या तक्रारीमुळे प्रशासनास नाहक वरिष्ठांचा रोष पत्कारावा लागत आहे. भविष्यात अशा बाबीस प्रतिबंध व्हावा याकरीता उपरोक्त ठिकाणी एक पोलिस कर्मचारी बंदोबस्तास्तव पुरविणेत यावा ही विनंती.