दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
पिढीजात परंपरेप्रमाणे दौंड मधील मानाच्या गणपतीची(पाटील वाडा) प्रतिष्ठापना गावचे पाटील वीरधवल जगदाळे व इंद्रजीत जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आली. सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षीप्रमाणे असणारी मिरवणूक टाळून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत पहिल्यांदाच साध्या पद्धतीने यावेळी गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी मोजकेच ग्रामस्थ उपस्थित होते. गणरायाचे विसर्जन देखील शासनाने दिलेल्या नियमानुसारच करणार असल्याचे वीरधवल जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
दौंड शहरातील हिंदू- मुस्लिम ऐक्याची परंपरा जपत दौंड मधील MIM पक्षातील मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांना मास्क’चे वाटप केले. आज बाजारपेठेत आपल्या लाडक्या बाप्पांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती. शहरात कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने, गणेश भक्तांना कोरोना महामारी चा संसर्ग होऊ नये या उद्देशाने पक्षाच्या वतीने सदरचा उपक्रम राबविण्यात आला. पक्षाचे शहराध्यक्ष मतीन शेख, हमीद शेख, अजगर शेख, शाहिद पानसरे आदींनी सदरचा उपक्रम राबविला आहे