दौंड : सहकारनामा ऑनलाईन
आज शहर व परिसरात नव्याने 5 करोना रुग्णांची नोंद झाली आहे. या आठवड्यात सातत्याने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील चार-पाच दिवसात साधारणतः 50 ते 55 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र याही परिस्थितीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.संग्राम डांगे हे जातीने लक्ष घालून अहोरात्र कष्ट घेत रुग्णांना सर्व सोइ सुविधा तसेच त्यांना लागणारे उपचार देण्यात कमी पडत नाहीत हे विशेष.
रविवारीच दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.संग्राम डांगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे सोमवार पासून झटपट रिपोर्ट देणाऱ्या रॅपिड अँटिजेन यंत्रणेमार्फत रुग्णांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या रॅपिड अँटीजेनसाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे डॉक्टरांनी आवर्जून सांगितले असून या रॅपिड अँटीजेन द्वारे मोठ्या प्रमाणावर रुग्णांची चाचणी घेण्यात डॉ.डांगे यांनी जिल्ह्यात बाजी मारली आहे.
आज दि. 25 ऑगस्ट रोजी एका दिवसात तब्बल 55 संशयितांची रॅपिड अँटीजेन मार्फत तपासणी करण्यात येऊन अवघ्या अर्ध्या तासातच त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. चाचणी करण्यात आलेल्या या 55 जणांपैकी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 25 ते 75 वर्ष वयोगटातील 3 पुरुष व 2 महिलांना संसर्गाची लागण झाली आहे. यामध्ये सोनवडी-2, खाजा वस्ति 1, बंगला साईड 1 तसेच डिफेन्स कॉलनी 1, असा या परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.