दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगाव, वरवंड आणि खोर परिसरात सध्या वाळू माफियांनी आपला डेरा जमवला आहे. हे वाळू माफिया दिवस-रात्र ओढे, नाल्यांमधून जेसीबी आणि तत्सम यंत्रांच्या साहाय्याने वाळू उपसा करून शासनाला दररोज लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. महसूल कर्मचाऱ्यांना न सापडणारे वाळू माफिया मात्र रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस यंत्रणेला सहज मिळून येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या वाळू माफियांनी केडगाव, वरवंड, खोर परिसरात असणाऱ्या ओढे आणि नाल्यांची अक्षरशः चाळण केली आहे. या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास हेच वाळू माफिया जबाबदार असून यांना स्थानिक शेत जमीन मालकांचीही तितकीच मोठी साथ मिळत आहे. शेतजमीन मालकाला एका गाडीमागे वाळू माफिया 5 हजार रुपये दर देत असल्याचे काही शेतजमीन मालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती सांगितली असून हीच चार ते साडेचार ब्रासची वाळू ने भरलेली गाडी वाळू माफिया सुमारे 30 ते 35 हजार रुपयांना विकत असल्याचे समोर येत आहे. एका रात्रीमध्येच हे वाळू माफिया लाखो रुपये कमवून शासनाच्या महसुलाला मोठ्या प्रमाणावर चुना लावत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
आज अशीच एक चार ब्रास वाळूने भरलेली ट्रक नं. एम.एच. १४ सी.पी. ९७२२ ही चालक नरसिंग बाबुराव थलगर याचे ताब्याततुन ट्रक मालक अमर पुर्ण नाव पत्ता माहीत नाही याच्या सांगण्यावरून भुलेश्वर स्टील कंपनीसमोरून पुणे बाजुकडे घेवुन जात असताना पोलिसांनी यावर कारवाई केली. ही वाळूने भरलेली ट्रक महसुल विभागाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता, शासनाची कोणतीही रायल्टी न भरता तसेच वाहन चालवण्याचा परवाना, ट्रकचे रजिस्ट्रेशन, कागदपत्रे न बाळगता ट्रकमध्ये चोरीची वाळू घेवुन जात असताना मौजे यवत गावच्या हद्दीत असणाऱ्या भुलेश्वर स्टील कंपनी समोर पुणे सोलापुर हायवे रोडवर चोरीची वाहतुक करताना मिळुन आला आहे.
याबाबत यवत चे पोलीस रणजित निकम यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.