दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील मळद गावाजवळ घडलेल्या 30 लाख रुपये लुटीचा थरार आता आणखीनच वाढताना दिसत आहे. लुटीचा घटना घडल्यानंतर पोलिसांनी लागलीच सुरक्षा यंत्रणेवर मेसेज टाकल्याने लुटारूंचे धाबे दणाणले गेले आणि एक दुचाकी आणि लुटीतील सुमारे 7-8 लाख रुपयांची रक्कम टाकून हे आरोपी फरार झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या लूटमार प्रकरणाबद्दल सखोल तपास सुरू केला असून यात वेगळाच वास येत असल्याचे आता जाणवत आहे, त्यामुळे या प्रकरणात आता खोलवर गेल्यानंतर नेमके सत्य समोर येऊन आरोपींना जेरबंद करणे सोपे होणार आहे.
मळद जवळ असणाऱ्या एका हॉटेल शेजारी ही घटना घडल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. माहिती मिळताच दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी लागलीच सुरक्षा यंत्रणेवर मेसेज फिरवून सर्वांना अलर्ट केले.
या नंतर संशयित दुचाकी शोधण्यात अनेकजण मग्न झाले, ही बाब आरोपींना समजली असावी त्यामुळे त्यांनी त्यातील दुचाकी आणि लुटीतील काही रक्कम पाटस टोल नाक्याजवळ असणाऱ्या पाटस-बारामती रस्त्यावर टाकून पोबारा केला आहे. पुढील तपास दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करत आहेत.