पुणे : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
राज्यात दररोज कुठे न कुठे अपघात घडत असतात. या अपघातांवेळी गरज असते ती जखमींना मदत करण्याची, त्यांना धीर देण्याची आणि त्यांच्यावर उपचार करण्याची. मात्र लोक सध्या माणुसकी विसरत चालले आहेत.
अशा अपघातांवेळी मदत करण्याऐवजी ते बघ्याची भूमिका घेऊन अशा ठिकाणावरून काढता पाय घेतात. मात्र अशा अडचणीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतींनी जखमी वाहन चालकांना नुसता धिरच दिला नाही तर त्यांची सर्वोतोपरी मदत करून एक आदर्श निर्माण केला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अशीच एक अपघाताची घटना घडली. हा अपघात लोणावळा घाटात दोन अवजड वाहनांमध्ये झाला होता. यावेळी अपघातग्रस्त वाहनाच्या चालकास प्रचंड वेदना होत असतानाही त्याच्या मदतीसाठी कुणीही थांबत नव्हते, प्रत्येकजण फक्त बघ्याची भूमिका घेत होते. अशा वेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या डॉ. अमृता मेणकुदळे, श्रीया भोसले, आरती हुळ्ळे, किर्ती मोरे या याच मार्गाने जात होत्या, त्यांनी अपघात स्थळी नुसते गाडी थांबविण्याचे धाडसच केले नाही तर या अपघातातील जखमींना हवी ती मदतही केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या युवतींनी त्या ट्रकचालकावर प्रथमोपचार करुन त्याला धीर दिला. माणूसकीच्या जाणिवेतून त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्याचे कौतुक केले आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती नेहमीच अशा प्रकारे आश्वासक अशा समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असतात याचा आम्हाला अभिमान वाटतो असा संदेशही लिहिला आहे.
महिलांवर पुरुषार्थ गाजवणाऱ्या पुरुषांना लाजवेल असे कार्य या युवतींनी केले आहे, त्यांच्या या कार्याचे आणि धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या युवतींच्या या कार्यामुळे राज्यातील अन्य युवती आणि महिला यांना निश्चितच प्रेरणा मिळेल यात शंका नाही.