कोरोना योद्धा API हनुमंत गायकवाड यांचे खंडाळा पोलीस ठाण्यात जंगी स्वागत, अनपेक्षित स्वागताने गायकवाड ही भारावले



पुणे – सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहायक  पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे कोरोना मुक्त झाल्यानंतर त्यांचे खंडाळा पोलीस ठाण्यात पुन्हा रुजू होताना खंडाळा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी जंगी स्वागत करत त्यांच्या कार्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या हिम्मतीचा गौरव केला.

हनुमंत गायकवाड हे चोर, दरोडेखोर आणि गुंडांचा कर्दनकाळ म्हणून त्यांची या परिसरात ओळख आहे. विविध गुन्ह्यांच्या तपासकामी बाहेर असताना त्यांना अचानक कोरोनाची लागण झाली. त्यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी त्वरित स्वतःची चाचणी करून अगोदर स्थानीक दवाखान्यात आणि नंतर पुण्यात उपचार घेतले.

उपचार सुरू असताना एक वेळ अशी आली होती की त्यावेळी डॉक्टरही त्यांच्या तब्येतीबाबत खात्री देऊ शकत नव्हते, कारण त्यांची ऑक्सिजन लेव्हल एकदम कमी झाली होती तसेच व्हेंटिलेटरचीही गरज भासत होती मात्र त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी हार मानली नाही.

या परिस्थितीमध्ये त्यांना सर्वात जास्त साथ लाभली ती सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची. पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी गायकवाड यांच्या उपचारासाठी नुसते चांगले हॉस्पिटलच दिले नाही तर त्यांना ऐनवेळी लागणारी प्रभावी इंजेक्शनही वेळेवर उपलब्ध करून देत त्यांना आपल्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांबद्दलची असणारी आस्था आपल्या कृतीतून दाखवून दिली. 

सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे कोरोना सारख्या महामारीला हरवून आपला क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ते खंडाळा पोलीस ठाण्यात पुन्हा रुजू व्हायला पोहोचताच तेथील पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, ग्रामस्थ यांनी फटाके वाजवत तसेच त्यांना ओवाळवून त्यांचे जंगी स्वागत केले.

या अनपेक्षित स्वागताने गायकवाड हे सुद्धा भारावून गेले होते. त्यांच्या कामामुळे त्यांच्या प्रति असणारा पोलीस स्टाफ मधील आदर आणि ग्रामस्थांमध्ये त्यांच्या प्रति असणारी आपुलकीची भावना प्रकर्षाने जाणवत होती.