अभिनेत्री कंगना राणावत, भाजप आमदार राम कदम, पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात दौंड पोलिसांकडे निवेदनाद्वारे तक्रार, कारवाई करण्याची मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

पुणे जिल्हा शिवसेना समन्वयक शरद सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सिनेअभिनेत्री कंगना राणावत, भाजपाचे आमदार राम  कदम तसेच पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात दौंड पोलिसांकडे निवेदनाद्वारे तक्रार नोंदविण्यात आली आहे. कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करून मुंबईचा POK असा अपमानास्पद उल्लेख करून मुंबईसह समस्त महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे असा आरोप यावेळी शिवसेनेने केला आहे. 

तसेच राम कदम यांनी महाराष्ट्र विरोधी समर्थन केल्यामुळे व  कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. कोरोना काळात जगणं मुश्किल झालेले असताना अशा परिस्थितीत जाणून बुजून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम पत्रकार अर्णव गोस्वामी करत आहे, त्याच्या बेताल वक्तव्या मुळे सामाजिक शांतता धोक्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सदर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई  करण्यात यावी अशी निवेदनात मागणी  करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी शरद सूर्यवंशी यांसमवेत शिवसेना तालुका प्रमुख अनिल सोनवणे, नगरसेविका अनिता दळवी, शिवाजी काळे, शितल मंडवाले, गणेश दळवी, संदीप बारटक्के, पांडुरंग दळवी, दीपक इंदलकर, संतोष धांडे,अनिल घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.