कानगाव येथे वाळू माफियांकडून शेतकऱ्याची जमीन खोदून वाळू चोरी, वाळू चोरी करणारे वाहन शेतजमीन मालकाने शेतातच पकडले. महसूल कर्मचारी घटनास्थळी दाखल, पोलिसांच्या करवाईकडे लक्ष



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील कानगाव येथे धरणग्रस्त असलेल्या आणि कानगाव येथे पुनर्वसन झालेल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीमध्ये वाळू माफियांनी अनधिकृतपणे वाळू चोरी करण्यासाठी वाहने नेऊन तेथे वाळू उपसा करत असताना खुद्द शेतकऱ्यानेच घटनास्थळी धाव घेऊन ती वाहने पकडल्याने वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आपली चोरी पकडली गेली असल्याचे लक्षात येताच वाळू माफियांनी वाहन आणि त्यामधे चोरलेली वाळू तेथेच सोडून धूम ठोकली आहे. मात्र शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे नुकसान करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी तलाठ्यांना त्वरित घटनास्थळी बोलावून कारवाई करावी अशी विनंती केली आहे.

यावेळी गाव कामगार तलाठी व्यवहारे यांसोबत संपर्क केला असता आम्ही कानगाव येथील शेतजमिनीत करण्यात आलेल्या वाळू चोरीचा आणि ती वाळू चोरून नेणाऱ्या गाडीचा पंचनामा करत असून कारवाई करण्यासाठी पोलिसांची वाट पाहत असल्याचे सांगितले आहे.

शेतकऱ्याच्या शेतामध्ये अनधिकृतपणे वाहने घालून तेथील वाळू चोरी करणारे वाळू माफिया हे त्या परिसरातीलच असल्याचे शेतकऱ्यांकडून समजत असून पाटस पोलिसांनी यामध्ये सामील असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.